'चला शाळेत जाऊया' अभियानांतर्गत सारोळा शाळेची विशेष पथकाकडून तपासणी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): जि. प. उच्च प्रा. शा. सारोळा येथे एस. एस. सी. बोर्ड छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष अनिल साबळे सचिव आर. एम. वाणी, सिल्लोड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जेश महाजन विस्तार अधिकारी रमेश ठाकूर तसेच आर. डी . फुसे केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव बडक, शिक्षणतज्ज्ञ विनायक वाघ यांची सारोळा शाळेला अचानक भेट दिली. सकाळी १० वाजता पथकाचे आगमन होताच शाळेच्या पथसंचलन पथकाच्या विद्यार्थीनीकडून मान्यवरांचे औक्षण करण्यात आले.

तसेच पुष्पगुच्छ व शाल देऊन मुख्यध्यापका कडून स्वागत करण्यात आले शाळेच्या संचलन पथकाने मानाची सलामी देत पथसंचलनाने वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी शालेय परिसर पाहणी केली. यात स्वच्छता गृह, परसबाग, किचन शेड, धान्याची साठवणूक व्यवस्था, सभागृह, भोजन कक्ष, खगोल लॅब, संगणक कक्ष, रॅम्प, संरक्षण भिंत, हॅन्ड वॉश स्टेशन, सी सी टिव्हि कॅमेरे, पिण्याचे पाणी, विद्युत दिवे, ग्रंथालय आणि वर्ग १ ते ८ च्या वर्गाची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासणी केली.

यादरम्यान वर्ग ६ वी च्या वर्गाने साहेबांची विशेष मुलाखत घेत विद्यार्थी व साहेब यांच्या संवादाने वातावरणात हर्षोल्लास निर्माण झाला. आजची विशेष बाब म्हणजे साहेबांनी आज च्या मेनूप्रमाणे असलेल्या शालेय पोषणाची चव घेऊन आहाराचा दर्जा बद्दल समाधान व्यक्त केले.

प्रत्येक शिक्षकाचा परिचय आणि शैक्षणिक अर्हता आणि त्यांनी घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. शालेय संपूर्ण अभिलेखे आणि नोंदींची पडताळणी करत शाळेचे भरभरून कौतुक केले. शिक्षकांशी मनसोक्त संवाद साधून मार्गदर्शन दिले जिल्हा परिषद शाळा आणखी कशा उच्च स्तरावर नेता येईल यावर चर्चा केली.

शाळेच्या संपूर्ण टिमच्या कामावर कौतुकाची थाप देत नवचैतन्य निर्माण केले. यावेळी नवीन शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा मंदा अमोल गवळी, उपाध्यक्ष संजय सांडू काळे, सर्व सदस्य, गावच्या सरपंच राधा मोहन गायकवाड, उपसरपंच नारायण वराडे, सविता गणेश काळे, ग्रामस्थ, पालक, मारोती वराडे, शाळेचे मुख्याधापक सुधाकर बावस्कर आणि सारोळा शाळेच शिक्षक वृंद उपस्थित होते.